
कोल्हापूर – करवीर तालुक्यातील वडणगे परिसरातील राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या गाठीभेटी आणि बैठका माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी उपस्थित सभासदांनी सत्ताधारी सहकार आघाडीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सभासदांच्या कल्याणासाठी नेहमीच प्रयत्न करणाऱ्या महादेवराव महाडिक आणि संचालक मंडळावर विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. पण टीका करणाऱ्यांची उंची जनतेला माहिती आहे, अशा शब्दात अमल महाडिक यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. तुमचा इतिहास काढला तर केवळ बेईमानी आणि फितुरीच हाती लागेल असा टोलाही त्यांनी लगावला. यांच्या हातात सत्ता गेली तर उद्या सभासदांना कारखान्यात येण्या-जाण्यासाठी टोल भरावा लागेल, अशी उपरोधिक टीका अमल महाडिक यांनी केली. तसेच पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील यांनीही विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. राजाराम बंधाऱ्याच्या नवीन पुलाचे काम थांबवून ज्यांनी शेतकऱ्यांची अडचण केली आहे, तेच आज शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेत आहेत. या पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर वडणगे परिसरातील शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी मोठा फायदा झाला असता. पण प्रत्येक कामात आडवे पडणाऱ्या माजी राज्यमंत्र्यांमुळे हे काम पूर्णत्वाला जाऊ शकले नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आडवणूक करणाऱ्यांना या निवडणुकीत सभासद जागा दाखवतील, असा विश्वास इंद्रजीत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बाजीराव पाटील (नाना),इंद्रजीत पाटील, डॉ. किडगावकर, दिलीप पाटील, शहाजी पाटील, तानाजी पाटील, प्रशांत तेलवेकर, बाजीराव पाटील, उमेश पाटील, शरद पवार, गणपतराव जाधव, पंडित चौगुले, नामदेव परीट, सुभाष पाटील, दीपक पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
