
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे नागपूरला जागतिक पातळीवर स्थान मिळाले आहे. गडकरींनी एवढं काम केलं आहे की, त्यांना आता मतं मागावीच लागणार नाहीत.गडकरी यांना सात लाखांपेक्षा जास्त न भूतो ना भविष्यती इतके मते मिळाली पाहिजेत. त्यांना मिळालेली मते मोजणाराही पागल झाला पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळली.
राष्ट्रीय महामार्ग ३५४-डीवर इंदोरा चौक-पाचपावली-अग्रसेन चौक-अशोक चौक-दिघोरी चौकपर्यंत ९९८.२७ कोटी रुपयांच्या निधीतून निर्मित होणाऱ्या ८.९ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये करण्यात आले. त्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री गडकरी, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर नेते उपस्थित होते.
