काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव : संयोगिताराजे छत्रपती

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे.

वेदोक्त प्रकरणातून समतेचा पाया रचणारे लोकराजा, करवीर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आयुष्याला क्रांतीकारक वळण देणारी घटना आहे. त्यामुळे त्यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या पत्नीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध केल्याने हा मुद्दा  पुन्हा एकदा  समोर आला आहे. मात्र, वेदोक्तच्या (Vedokta) ठिणगीने महाराजांनी दीर्घकाळ लढा देत सामाजिक न्यायाची लढाई जिंकली होती. संयोगीराजे यांनी आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की,नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पुजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच. तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली. या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.

🤙 8080365706