विरोधकांनी कारखाना प्रशासनाला वेठीस धरून बदनाम करू नये – दिलीप पाटील

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी पार पडली. यावेळी पोटनियमांचे उल्लंघन केलेल्या अश्या काही सभासदांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. त्यामुळे सत्य परिस्थिती आणि नियमानुसार झालेली कारवाई पाहता त्यांनी या निर्णयाचा आदर करणे अपेक्षित होते. असं न करता निवडणुकीसाठी आता काहीच मुद्दा शिल्लक नसल्याने काही लोक विनाकारण या मुद्द्याला कवटाळून राजकारण करत आहेत. काल सकाळी विरोधकांकडून कारखाना प्रशासनाकडे रंजना अशोक पाटील व अशोक उमराव पाटील अश्या 2 व्यक्तींचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या अर्जानुसार त्यांना माहिती देण्यात आली. इतर कोणाचाही अर्ज काल आला नव्हता. पण विरोधकांनी मात्र अर्ज देऊनही माहिती दिली नाही अश्या प्रकारे धादांत खोटा आरोप केला. त्यातही  काल दुपारनंतर रामनवमीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना कार्यस्थळावर अधिकारी उपस्थित नव्हते. नेमकी हीच संधी साधून संध्याकाळी विरोधकांनी जाणूनबुजून कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घातला. अवैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांसाठी कागदपत्रे घ्यायला गेलो आणि तिथून सगळे पळून गेले असं खोटं चित्र उभं केलं गेलं.

आज पुन्हा तश्याच पद्धतीने गोंधळ घालण्याचा मानस ठेऊन ते कारखान्यात आले होते. पण नेहमी प्रमाणे कारखाना प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली. उपस्थितांना अर्ज उपलब्ध करून दिले आणि रीतसर अर्ज भरून घेऊन स्वीकारलेसुद्धा. कारखाना प्रशासनाने नेहमीच सभासदांना सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. मागील आठवड्याभरात जवळपास 600 ते 700 अर्जानुसार कारखाना प्रशासनाने माहिती व दाखले तत्परतेने उपलब्ध करून दिलेले आहेत, हे मात्र विरोधक सोईस्करपणे विसरताना दिसतात.

काल त्यांनी जी काही स्टंटबाजी केली आणि खोटं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही तथ्य नाही. निवडणुकीची सर्व प्रक्रिया कारखाना प्रशासन आणि शासकीय यंत्रणा अतिशय पारदर्शकपणे आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत आहेत. तरीही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, परत जर कोणी विनाकारण कारखाना कार्यस्थळावर गोंधळ घालणे किंवा प्रशासनास वेठीस धरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडूनही जश्यास तसेच उत्तर दिले जाईल.असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.

🤙 8080365706