
गारगोटी : राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजना व मनरेगा अंतर्गत 6 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा विनियोग केला जाणार असून, या भरीव निधीमुळे राधानगरी शहरासह पंचक्रोशीती नागरीकांचे श्रद्धास्थान असलेले राधानगरी शहरातील अंबाबाई मंदीर, भुदरगड तालुक्यासह परराज्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले व संत बाळूमामा यांचे गुरूवर्य सदगुरू मुळे महाराज मंदीर व आजरा तालुक्यातील हाळोली गावासह पंचक्रोशीतील भक्तांचे श्रध्दास्थान चाळोबा मंदीर यांच्या वैभवात भर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मनरेगा अंतर्गत राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे, कोते पैकी गोतेवाडी, आवळी खुर्द व भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक व पळशिवणे आदी गावांचा समावेश असून याठिकाणीवरील विकासकामे मार्गी लागणार आहेत.राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण व नागरी भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमुहातील नागरीकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्र विकास योजनेतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील 5 गावांतील विकास कामांसाठी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून राधानगरी तालुक्यातील राधानगरी शहरातील अंबाबाई मंदीर चौक परिसर सुशोभिकरण करणे 1 कोटी 75 लाख, भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरातील सदगुरू मुळे महाराज मंदीर चौक सुशोभिकरण 1 कोटी 50 लाख व आजरा तालुक्यातील हाळोली येथील चाळोबा मंदीर चौक परिसर सुशोभिकरण करणेसाठी 1 कोटी 75 लाख असा एकूण मिळणून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मनरेगा अंतर्गत राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक 25 लाख, कसबा तारळे 25 लाख, कोते पैकी गोतेवाडी 25 लाख, आवळी खुर्द 25 लाख, भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक 25 लाख, पळशिवणे 25 लाख असा एकूण 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.तसेच अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र योजनेअंतर्गत राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे 15 लाख, राशिवडे बुद्रुक 15 लाख, भुदरगड तालुक्यातील तिरवडे 15 लाख, अनफ बुद्रुक 15 लाख व आजरा तालुक्यातील साळगांव 15 लाख असा 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
