
कोल्हापूर: तेवीस दिवस प्रकल्पगस्त जनता ऊन, वारा, थंडी व पावसाची पर्वा न करता या ठिकाणी आपल्या न्याय्य मागण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहे. मधल्या काळात प्रधान सचिव मदत व पुनर्वसन यांनी संबंधित प्रश्नाबाबत बैठक लावली होती, परंतु शासकीय कर्मचारी यांच्या संपामुळे बैठक पुढे ढकलली, आता संप मिटला आहे, आज सकाळी त्यांच्याशी बोलणे झाले आहे. दोन दिवसात बैठकीची तारीख देतो असे म्हणाले आहेत. यामध्ये दिरंगाई झाल्यास २३ तारखेला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या हुतात्मा दिनी आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार असून त्या दिवशी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्रधान सचिवांची बैठक होऊन अंतिम निर्णयांची बैठक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत होऊन निर्णय आमच्या मागणीप्रमाणे झाले पाहिजेत तरच या ठिकाणी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले जाईल. ते पुढे म्हणाले की, स्थानिक पातळीवरील प्रश्नाबाबत काही अधिकारी प्रसार माध्यमातून अभयारण्यग्रस्तांच्या बाबतीत लाभक्षेत्रातील जमीन देता येणार नाही अशी चुकीची माहिती देत आहेत, त्यांनी अशी विधाने करताना जपून करावीत किंवा आमचा सल्ला घेऊन करावीत असा टोमनाही त्यांनी अधिकाऱ्यांना मारला. आमच्याकडे जी कागदपत्रे आहेत ती त्यांच्या दप्तरामधीलच आहेत, त्यांनी आपल्याकडे असणारे दप्तर तपासावे असेही ते म्हणाले. जर या विषयी सुधारणा झाली नाही तर मंत्रालय पातळीवर याची चर्चा करावी लागेल असे ते म्हणाले.[ आज माजी राज्यमंत्री आ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मंत्रालय पातळीवर बैठक लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले] आज लाभक्षेत्रातील लाटवडे गावचे सरपंच संभाजी पवार व ग्रामस्थ यांनी पाठिंबा देऊन मदत केली व आंदोलन लांबल्यास आम्ही पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे सांगितले. यावेळी उखळू गावच्या ग्रामपंचायत सदस्य रेश्मा मुठल यांचा तीन वर्षांचा चिरंजीव अद्वैत याने डॉ. भारत पाटणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी संतोष गोटल, मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, शामराव कोठारी, पांडुरंग कोठारी, रफिक पटेल, वसंत पाटील, अशोक पाटील, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, विनोद बडदे, आनंदा आमकर, शंकर पाटील, बाळू पाटील, सुरेश पाटील, आकाराम झोरे, इत्यादी प्रमुख कार्यकर्ते व मोठया संख्येने स्त्री- पुरुष आंदोलक उपस्थित होते.
