
सातारा : ‘राजकारणात टीका करताना मर्यादा पाळाव्या लागतात.पण, खा. संजय राऊत ज्येष्ठ असूनही काहीतरी बोलत सुटतात. त्यांना लोकं कंटाळलेत. त्यांनी आमच्या ५० आमदारांवर टेस्टट्यूब बेबीची टीका केली. त्यांनीच राऊतांना मतदान केले होते. मग राऊत सरोगेट मदर बेबी ठरले,’ असा घणाघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सातारा लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेची (शिंदे गट) बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव उपस्थित होते.राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राज्यात शिवसेनेची बांधणी सुरू आहे. विधानसभा, लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखपदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सातारा लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात आलो. या ठिकाणचे शिवसेनेचे चित्र चांगले दिसून आले. येथे पक्षाची भक्कम बांधणी झाली आहे. जिल्ह्यात आठपैकी दोन आमदार पक्षाचे आहेत. आगामी काळात सातारा जिल्हा हा शिवसेनेचाच होईल, असा विश्वास आहे.
