
नाशिक : हवामान विभागाच्या अंदाजानुसार वातावरणात पुन्हा बदल झाल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

पावसाचे तुरळक थेंब पडू लागल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जातोय का अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील पश्चिम भागातील सायखेडा चांदोरी सह परिसरातील गावांना फटका बसला होता, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे चाळीस ते पन्नास रुपये किलो मिळणारे बाजार भाव अक्षरशः उत्पादन खर्च निघणार नाही असा पंधरा ते वीस रुपये पर्यंत कोसळल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह करावे कसे ? घेतलेले कर्ज फेडावे कसे ? असा यक्ष प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पडू लागला आहे.गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कोसळला होता याच वेळेला वादळी वारा देखील मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले होते.
