
भेंडवडे : “आमच्या विरोधकांनी गगन बावड्यातील डिवाय पाटील कारखान्यात एका रात्रीत ४५०० सभासद कमी करून सहकार संपवला, सभासदांचे हक्क काढून घेतले. तिथे जे पाप केलं ते कसबा बावड्यातील राजाराम कारखान्यात करू देणार नाही. राजाराम कारखाना सर्व १२२ गावातील सभासदांचा आहे, तो तसाच राहावा यासाठी आमची लढाई आहे.” अशी प्रतिक्रिया मा.आ.अमल महाडिक यांनी व्यक्त केली.

“इतका प्रदीर्घ काळ सत्ता असूनही महाडिकांनी कधी सहकारी संस्थेचं नाव बदलणे, तिथले सभासद कमी करणे, कर्मचाऱ्यांना द्वेषभाव ठेऊन त्रास देणे अशी प्रवृत्ती ठेवली नाही. याउलट सत्ता असलेली प्रत्येक संस्था वाढवण्याचं आणि सहकार जपण्याचं काम महाडिक कुटुंबाने केलेलं आहे. आधी महाडिक साहेबांच्याच पॅनलमधून निवडून आलेली आणि चेअरमनपद भोगून आता विरोधी आघाडीत गेलेली माणसं जर आमच्या नेतृत्वावर बोलत असतील, तर त्यांना मतपेटीतून उत्तर देण्याइतके राजाराम कारखान्याचे सभासद सुज्ञ आहेत” अश्या शब्दात माजी चेअरमन शिवाजी रामा पाटील यांनी सर्जेराव माने यांचा समाचार घेतला. अमल महाडिक यांनी आज राजाराम सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील लाटवडे,भेंडवडे, खोची, हालोंडी इत्यादी गावांचा दौरा केला. गावांमधील प्रमुख नेत्यांसह सभासद शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधी आघाडीकडून सातत्याने टीका करणारे सर्जेराव माने यांच्या गावातूनच अमल महाडिक यांनी दौऱ्याला सुरुवात केल्याने याबाबत सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.
