
कोल्हापूर : दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. बुधवार दि. 8 मार्च 2023 रोजी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार हिंदीचा पेपर होता. मात्र नवनीत प्रकाशनाने दहावी परीक्षेचे वेळापत्रक छापले असून त्यावर हिंदी पेपरच्या परीक्षेची तारीख दि. 9 मार्च 2023 विद्यार्थ्यांना वितरित केलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी या पेपरला मुकले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या या नवनीत प्रकाशनावर शिक्षण विभागाने बंदी घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा संघटक निलेश सुतार यांनी केली आहे.

ऐतिहासिक दसरा चौकात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने नवनीत प्रकाशनावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी नवनीत प्रकाशनाचे नाव असलेल्या प्रतींचे दहनही करण्यात आले.’जय जिजाऊ जय शिवराय’, ‘संभाजी महाराज की जय ‘ ‘शिवाजी महाराज की जय’ ,’ दहावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या नवनीत पब्लिकेशनच करायचं काय ,खाली डोक वर पाय ‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक निलेश सुतार म्हणाले, दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. नवनीत या खाजगी प्रकाशनाने वेळापत्रकात बदल करून 8 मार्चला असणारा पेपर 9 मार्चला टाकून हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. हे वेळापत्रक चुकीच्या पद्धतीने काढले आहे. कोल्हापुरातही वेळापत्रक मिळाल्यानंतर विद्यार्थी त्याच वेळापत्रकानुसार 9 तारखेला पेपर ला गेले. परंतु पेपरला गेल्यानंतर पेपर 8 तारखेलाच झाल्याचे त्यांना समजले.त्यामुळे प्रचंड खळखळ उडाली, हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शिक्षण विभागाने नवनीत पब्लिकेशन ची चौकशी करून कडक कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.यावेळी या आंदोलनात भगवान कोइंगडे, कुवरसिंह भोसले, सचिन गुरव, अजित मडके, उदयशंकर घाटगे, गणेश सुतार, महेश गुरव, दीपक गुरव, अमित आयघोळ, धनाजी कांबळे, भारत सुतार सहभागी झाले होते.
