पोलीस पाटलांचे मानधन वाढवा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :पोलीस पाटील हा ग्रामीण व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. या पोलीस पाटलांच्या मानधनातही वाढ करावी . तसेच पोलीस पाटलांना ग्रामपंचायतीमध्ये कामकाजासाठी स्वतंत्र टेबल देण्याच्या निर्णयाची प्रभावी अमलबजावणी करावी, पोलीस पाटील पद हे मानधनावरील पद असल्याने त्यांना व्यवसाय करण्याची मुभा असावी, अशा मागण्या काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यानी शुक्रवारी विधानपरिषदेत केल्या.

आ.पाटील यांच्या या मागण्याना अर्थमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मानधन वाढीबाबत मात्र अधिवेशन संपल्यावर पोलीस पाटील संघटनेच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन निर्णय घेऊ असे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.आमदार सतेज पाटील यानी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, मी ग्रामविकास विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम पाहत असताना ग्रामपंचायतीमध्ये पोलीस पाटलाना कामकाजासाठी स्वतंत्र टेबल देण्याचा निर्णय घेतला होता.याची काही प्रमाणात अंमलबजावणी झाली आहे .पोलीस पाटील या पदावर आता काही महिलाही कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस पाटील यांच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र टेबल देण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचबरोबर पोलीस पाटलांनी हा व्यवसाय करू नये, तो व्यवसाय करू नये अशा तक्रारी येत असतात. मात्र हे पद हे मानधनावरील असल्याने पोलीस पाटलांना कुठलाही व्यवसाय करण्याची मुभा देण्याची तरतूद कायद्यात करावी. तसेच पोलीस पाटलांचे मानधन वाढवत असल्याची घोषणा करावी, अशी मागणी आमदार पाटील यानी केली.

आमदार पाटील यांच्या मागणीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या मागण्या बाबत आम्ही सकारात्मक विचार करू. पोलीस पाटलांना ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र टेबल देण्याच्या सुचना शासनाकडून दिल्या जातील. पोलीस पाटील हे मानसेवी पद असून त्याना व्यवसाय करण्याची मुभा आहेच. त्यांच्या मानधनावाढी बाबत अधिवेशनानंतर त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री फडणवीस यानी यावेळी दिली.

🤙 8080365706