
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीतील सभासदांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील गटाने “खोटं बोल पण रेटून बोल” ही महाडीकांची संस्कृतीच आहे असा टोला आमदार सतेज पाटील गटाने लगावला.

प्रारूप मतदार यादीवर घेतलेल्या हरकतीवर निकालानंतर अंदाजे ७५० सभासदच वैध होण्याची शक्यता आहे. येणा-या निवडणुकीत पराभव होण्याच्या भितीने महाडिक गटाकडून १८९९ हा सभासदांचा आकडा जाणिवपूर्वक सभासदांच्या मध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी फुगवून सांगितला जात आहे.पूर्वीपासून आकड्यांचा खेळ करण्यात महाडीक पटाईत आहेत याची राजारामच्या सभासदांना माहिती आहे. असे म्हणत मोहन सालपे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.कारखान्याची सध्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील येलुर आणि इतर परीसरातील ९९८ सभासदांच्या पात्रतेबाबत आम्ही हरकत घेतली होती. या हरकतीसोबत आवश्यक ते सर्व महसुली पुरावे आम्ही सादर केले होते. तसेच याबाबत झालेल्या सुनावणीच्या वेळीही हे सभासद पात्र नसल्याने मतदार यादीतुन त्यांची नावे कमी करण्याबाबत आग्रही मागणी केली होती. राजकीय दबावापोटी आमची हरकत फेटाळुन लावली आहे त्यामुळे ही नावे अंतिम मतदार यादीत येण्याची शक्यता आहे. तथापि आम्ही घेतलेल्या माहीती नुसार २५० हुन अधिक सभासद मयत आहेत. त्यामुळे ९९८ पैकी उर्वरीत ७०० ते ७५० इतकीच नांवे अंतिम मतदार यादीत राहण्याची शक्यता आहे.याच आकड्यांच्या खेळाची माहिती इतर प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, डिजीटल माध्यमांना महाडिक गटाकडुन दिली जाणार आहे. कृपया माध्यमांनी याबाबत वस्तुस्थिती जाणुन घेवुनच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करावे, असे आवाहन मोहन सालपे, संदीप नेजदार यांच्यासह सतेज पाटील समर्थकांनी केली आहे.
