
नाशिक : नाशिकच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला तिच्याच आईकडून प्रसूती करून घ्यावी लागली आहे.आरोग्य केंद्रात कोणीही उपस्थित नसल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या वतीने दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

त्यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून राज्याच्या आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित केले आहे. नाशिकच्या अंजनेरी येथील हा प्रकार संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारा ठरला आहे.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात एक महिला आणि तिची आई प्रसूतीसाठी आल्या होत्या. मात्र, याठिकाणी डॉक्टर आणि नर्स नसल्याने महिलेच्या वृद्ध आईनेच मुलीची प्रसूती केली आहे. सुदैवाने यामध्ये कुठलाही दुर्दैवी प्रकार घडला नाही.मात्र, महिलेच्या प्रसूती दरम्यान काही प्रसंग ओढवला असता तर यास जबाबदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थि होऊ लागला आहे. हे संपूर्ण प्रकरण समोर आल्याने महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दाखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे असे आदेश दिले आहे.
