
होळी आणि डोळ्यांचा त्रास व डोळ्यांना कायमस्वरूपी होणाऱ्या इजांमागील प्रमुख कारणांपैकी एक झाला असून तज्ञांनी होळी खेळताना डोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची हे सांगितलं आहे.

सणाचा आनंद व मजा यांचे रूपांतर काही जणांसाठी वेदना व दु:खामध्ये होणे दु:खद आहे. कृत्रिम रसायनांपासून तयार केलेल्या रंगांचा डोळे, त्वचा व शरीराच्या अन्य भागांवर किती वाईट परिणाम होतो याची माहिती अनेकांना नसते. बाजारात निकृष्ट दर्जाचे रासायनिक रंग विक्रीसाठी ठेवले जातात. त्याचा डोळ्यांवर हानीकारक परिणाम होतो आणि त्यामुळे काही दीर्घकालीन जटीलता निर्माण होऊन कायमस्वरूपी दृष्टी गमावण्यासारखे गंभीर परिणामही होतात.
कृत्रिम रंग डोळ्यात जातात, तेव्हा डोळ्यांची जळजळ होते, लाल होतात, सुजतात. या हानीकारक रसायनांमुळे अॅलर्जीसारखी रिअॅक्शन येऊ शकते. त्यातून प्रादुर्भाव व अन्य दुखापतीही होऊ शकतात. कृत्रिम व विषारी रसायनांमध्ये औद्योगिक रंग (डायीज) असतात आणि होळीचे रंग तयार करताना त्यात अल्कली मिसळली जाते.पाण्याचे फुगे हा आणखी एक चिंताजनक घटक आहे. लहान मुले पाण्याच्या फुग्यांमुळे होणारे परिणाम न समजल्यामुळे ते एकमेकांवर फेकतात. पाण्याचा फुगा बेसावध स्थितीतील व्यक्तीच्या डोळ्यांवर आदळल्यास त्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो आणि डोळ्यांना कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या दुखापती होतात. डोळ्याच्या खोबणींना फ्रॅक्चर झालेले, रेटिना भंगलेले आणि होळीदरम्यान चेहऱ्यावर मारल्या जाणाऱ्या पाण्याच्या फुग्यांमुळे कायमचे अंधत्व आलेले रुग्ण आम्ही बघितले आहेत.आपण काही प्रतिबंधात्मक उपाय केले, तर होळीदरम्यान डोळ्यांना होणाऱ्या दुखापती टाळणे अगदीच शक्य आहे. आपली मुले रंग खेळताना कोणती उत्पादने वापरत आहेत याची जाणीव पालकांना असणे खूप महत्त्वाचे आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे आणि रंगांचा उत्सव सुरक्षित व संरक्षित मार्गाने कसा साजरा करावा याबद्दल त्यांच्या मित्रांशी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
