
खेड : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा होणार आहे.

निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गेल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे गोळीबार मैदानावरून धडाडणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या तोफेच्या माऱ्यात कोण कोण शरपंजरी होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांचं कोकणात वर्चस्व आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या नेत्यांचा कसा समाचार घेतात आणि या नेत्यांबाबत कोणते गौप्यस्फोट करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
