
गारगोटी: राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा–२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून 14 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

यामध्ये राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते मानेवाडी धनगरवाडा 3.82 कि.मी. रस्त्यासाठी 3 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तसेच भुदरगड तालुक्यातील बेडीव ते झुलपेवाडी तालुका हद्द 5.18 कि.मी. रस्त्यासाठी 4 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यासह आजरा तालुक्यातील शेळप आंबार्डे लिंगवाडी 6.71 कि.मी. रस्त्यासाठी 5 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते मानेवाडी या रस्त्यामुळे धनगरवाड्यावर राहणाऱ्या धनगर बांधवांची गेली अनेक दिवसांची मागणी पुर्णत्वास जाणार आहे. यामुळे येथील नागरीकांना दळणवळणाकरीता मदत होणार आहे. भुदरगड तालुक्यातील बेडीव ते झुलपेवाडी तालुका हद्द हा रस्ता खराब झाला असल्यामुळे या भागातील नागरीकांची गैरसोय होत होती.
हा रस्ता पुर्ण करण्याची मागणी नागरीकांकडून वारंवार होत होती. यानिधीमुळे हा रस्ता देखील पुर्ण होणार असून नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे. यासह आजरा तालुक्यातील शेळप आंबार्डे लिंगवाडी या रस्त्याचे शेळप गावापर्यंत काम पुर्ण झाले असून यामुळे या रस्त्यावर गोव्याकडे जाणाऱ्या नागरीकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे. यामुळे शेळप पासून पुढे आंबार्डे लिंगवाडी पर्यंत रस्ता पुर्ण झालेस आंबोली पर्यंत हा रस्ता जाणार आहे. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची रहदारी वाढणार असून स्थानिक नागरीकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. राधानगरी विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार आहे. मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला तो मी माझ्या कामातून सार्थ ठरविणार आहे. येत्या काळात केंद्र व राज्य शासनामार्फत उर्वरित रस्ते कामांसाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ.आबिटकर यांनी सांगितले.
