
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ संचालक असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे.
या कर्मचाऱ्याची नुकतीच ईडीकडून 30 तास चौकशी करण्यात आली होती. या चौकशीमुळे हा कर्मचारी तणावात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, संबंधित कर्मचारी आज बँकेत काम करत असताना या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या कर्मचाऱ्याचं नाव सुनील लाड असं आहे.
सुनील लाड हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वैयक्तिक कर्ज विभागातील व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी नुकतीच त्यांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज ते बँकेत आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील लाड यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील लाड यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. डॉक्टर शर्थीने प्रयत्न करत आहेत.
