
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीतील मुख्यालयसह गडहिंग्लज तालुक्यातील हरळी व कागल तालुक्यातील सेनापती कापशी शाखेवर ईडीने छापेमारी करीत बँकेच्या ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे .त्यामुळे संतप्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी एक तास काम बंद आंदोलन केले.

यावेळी ईडीच्या कारवाईचा निषेध केला. गुरुवारी कोल्हापुरात मुख्य बँक शाखेच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी एकत्रित जमताना जोरदार घोषणाबाजी केली. ईडीकडून समन्स बजावण्यात आले असले तरी शुक्रवारी हजर करू अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली होती मात्र ,ती फेटाळण्यात आल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. निषेधाच्या घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. 30 तासांपासून बँकेमध्ये कारवाई सुरूच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता होती. गुरुवारी सकाळपासून आपापले विभाग सोडायचे नाहीत असे आदेश देण्यात आले होते. चार च्या सुमारास सर्व कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह ५ अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी आक्रमक झाले.
