
कोल्हापूर : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दि.०९ फेब्रुवारी रोजी होणारा वाढदिवस समस्त शिवसैनिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री ठरलेल्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्य विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा उपक्रम राबविले जाणार असून, मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा होण्याकरिता जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.
दि.०९ रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांची आढावा बैठक आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ येथे पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार बाळासाहेबांची शिवसेना कार्यरत आहे. गत महिन्यात झालेल्या शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त शहरात १२ ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन करून, शिवसैनिकांनी जनतेसाठी बाळासाहेबांची शिवसेनाच अग्रभागी असल्याचे दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके शिष्य धर्मवीर आनंद दिघे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेलं नेतृत्व म्हणजे अनाथांचा नाथ एकनाथ असे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार तमाम शिवसैनिकांनी केला आहे.
या वाढदिवसाला लोकोत्सवाचे स्वरूप देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे. यामध्ये प्रामुख्याने ९ ठिकाणी विविध विकारावरील तपासणी, उपचार आदींचे आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावीत, जिल्ह्यातील शासकीय व खाजगी ब्लड बँकांच्या माध्यमातून ९ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, जिल्हा/ शहर पातळीवर ९ ठिकाणी विविध प्रकारच्या क्रीडा (क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो-खो, हॉकी, बुद्धिबळ, कॅरम, ज्युदो अशा सांघिक खेळासह वैयक्तिक) स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूना वाव द्यावा, जिल्ह्यात ९००० सदस्य नोंदणी करण्याचे अभियान राबवून पक्षवाढीस चालना द्यावी, जिल्ह्यात ९ ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शाखांची स्थापना करण्यात यावी, जिल्ह्यात ९ ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी शाखांची स्थापना करण्यात यावी, जिल्ह्यातील ९ महाविद्यालयांवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या युवा सेनेच्या शाखांची स्थापना करण्यात यावी, जिल्ह्यात ९ ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे (उदा.वृद्धाश्रम, शासकीय रुग्णालय येथे फळेवाटप, बालसंकुलांस मदत, फिरस्त्यांना अन्नदान/वस्त्रवाटप, वृक्षारोपण आदी) आयोजन करण्यात यावे, जिल्ह्यात ९ ठिकाणी सांस्कृतिक उपक्रमांचे (उदा.महिला स्पॉट गेम्स, कला महोत्सव, संगीतसंध्या आदी.) आयोजन करण्यात यावे, जिल्ह्यात ९ ठिकाणी (उदा.नाट्य, नृत्य, गायन, चित्रकला, मूर्तीकला आदी स्पर्धा) कलात्मक स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, जिल्ह्यात ९ ठिकाणी विकास कामांचे उद्घाटने करण्यात यावीत, यासह गाव, तालुका, पातळीवर जेष्ठ नागरिक, लहान मुले यांच्यासोबत केक कापून आनंद द्विगुणीत करण्यात यावा. अशा पद्धतीने जिल्हा पातळीवर लोकोपयोगी कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करावा, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, प्रा.शिवाजीराव पाटील, तुकाराम साळोखे, उदय भोसले, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व तालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
