
मुंबईः खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मानहानीची नोटीस बजावण्याची तयारी सुरु केली आहे. एक तर माफी मागा किंवा तुमचे आरोप कोर्टात सिद्ध करा, असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिलंय.
नारायण राणे यांनी आतापर्यंत शिवसेना नेते आणि संजय राऊत यांच्यावर अनेक आक्रमक वक्तव्य केली आहेत. नेमक्या कोणत्या वक्तव्यावरून संजय राऊत त्यांना नोटीस बजावत आहेत, असा प्रश्न विचारला जातोय. संजय राऊतांना राज्यसभेत खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. नेमक्या याच वक्तव्याचा खुलासा आता त्यांना द्यावा लागणार आहे. हे वक्तव्य नेमकं काय ते पाहुयात- नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नारायण राणे म्हणाले, हा संपादक आहे. याने चांगलं लिहावं. हा खासदार आहे, हे माझंच पाप आहे. बाळासाहेबांनी त्या वेळेला मला बोलावलं. संजय राऊतला खासदार बनवायचंय. उद्या फॉर्म घेऊन जा, त्याला खासदार कर. मी साहेबांसमोर कधी नाही म्हणाले नाही.दुसऱ्या दिवशी मी विधानभवनात त्याला बोलावलं. हा संजय राऊत खासदार बनायला निघाला. इलेक्शन यादीत नाव नव्हतं. स्कुटिनीत त्याला मी पास करून घेतलं. इलेक्शन रोलमध्ये नाव नसताना… हा खासदार बनवायला मी पैसे खर्च केले. आज रक्कम सांगणार नाही. एवढे उपकार केले. खर्च मी केला. आणि हा माझ्यावर टीका करतो.. असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं.
