
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाचे माध्यमातून सन २०१९ पासून जल जीवन मिशन हा एक महत्वांकाक्षी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
सदर अभियानांतर्गत “ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना विहीत गुणवत्तेसह, पुरेसे (५५ लिटर प्रति मानसी, प्रतिदिनी) व नियमित स्वरुपात पाणी पुरवठा करण्याचे” उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. अद्यापपर्यत कोल्हापूर जिल्हयात सर्व 12 तालुक्यात एकुण 81.60% कुटुंबांना कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच, माहे मार्च 2024 अखेर पर्यंत संपुर्ण जिल्हा हा “हर घर नल से जल” म्हणून घोषित करण्याचे राज्याने उद्दिष्ट ठेवले आहे. ‘हर घर नल से जल’ या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार, प्रसिध्दी देणेचे काम सुरु आहे. त्याअनुषंगाने दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन संदर्भात कार्यवाही करणेत येणार आहे.

ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांना आमंत्रित करुन विशेष स्थान देण्यात येवुन व समिती सदस्यांची ओळख तसेच त्यांच्या अधिकार व जबाबदारीबाबत उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार .पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षणांतर्गत पाणी गुणवत्ता चाचणीसाठी प्रशिक्षीत करण्यात आलेल्या 5 महिलांना सभेस आमंत्रित करुन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील पाणी गुणवत्ता प्रशिक्षित महिलांची संपर्क क्रमांकासहीत नावे गावातील सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे प्रसिध्द करणेत येणार आहेत, जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढीस लागून पाणी गुणवत्ता राखण्याच्या अनुषंगाने गाव स्वयंनिर्भर होईल. ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच संचातुन पाणी नमुना तपासणीचे प्रात्यक्षीक आरोग्य सेवक व जलसुरक्षा मार्फत करणेत येणार आहे. तसेच ग्रामसभेत क्षेत्रिय तपासणी संच च्या माध्यमातून महिलांद्वारे स्त्रोतांची तपासणी व नळ जोडणीव्दारे येणाऱ्या पाण्याच्या नियमित तपासणीबाबतच्या कार्यपध्दतीची माहिती ग्रामसभेमध्ये देणेत येणार आहे आहे. ग्रामसभेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर योजनेची सविस्तर माहिती जसे योजनेचे उद्दिष्ट, योजनेतील समाविष्ट उपांगे, मंजुर निविदेची रक्कम, योजनेचा कालावधी, कंत्राटदारांचे नाव, नळ जोडणीची सद्यस्थिती इ. तसेच प्रगतीत असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची माहिती देण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत गावातील पाणी पुरवठा सुविधांच्या अनुषंगाने आवश्यक जमा करावयाचा समुदायाचा वाटा (लोकवर्गणी 10%), जमा झालेली रक्कम व उर्वरित जमा करावयाची रक्कम याबाबत आवश्यक कृती योजना आखण्यावाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी योजनेची भौतिक कामे अंतिम टप्प्यात आहेत अशी गावे “हर घर नल से जल” म्हणून घोषित करणेत येणार आहेत. नळ पाणी पुरवठा योजना पुर्णत्वानंतर योजना शाश्वततेच्या दृष्टीने आवश्यक पाणीपट्टी वसुली.तसेच योजनेची थकीत पाणीपट्टी वसुलीसंदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची माहिती दर्शविणारे माहिती फलक योजनेच्या ठिकाणी प्रदर्शित करणेबाबत सर्व ग्रामपंचायतींना सुचित करण्यात आलेले आहे.जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये जलजीवन मिशनच्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकांवर ग्रामस्थांमध्ये जनजागृती करावी. तसेच ग्रामस्तरावरील सर्व विकास योजनांच्या माहितीबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
