
मुंबई : मुंबईतील रस्ते डांबरीकरणाच्या कामावरून पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या निमित्ताने शिंदे फडणवीस सरकारने ठाकरे परिवारावर जोरदार टीका केली. डांबरीकरणाच्या नावाखाली काळ्याचे पांढरे करणाऱ्यांची दुकाने आमच्या सीसी रोडच्या कामामुळे बंद होतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

गेल्या सहा महिन्यात ज्या वेगाने आम्ही काम करतो म्हणून काही जणांच्या पोटात दुखते आहे.परंतु आम्ही या टिकेला दहा पटीने काम करून उत्तर देऊ असेही शिंदे म्हणाले. आगामी तीन वर्षात मुंबईचा कायापालट करू. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ट्रिपल इंजिन सरकार होणार असल्याचाही दावा शिंदे यांनी केला. येत्या दोन वर्षात मुंबई आणि महाराष्ट्राला नवीन ओळख देणार आहे. पुनर्विकास योजनांसाठी पंतप्रधानांचे आशिर्वाद हवे आहेत. आगामी काळात नवा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.