मंत्री मुश्रीफांच्या आरोपावर अखेर राजे समरजीतसिंह घाटगे यांचे प्रत्युत्तर…

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापामारी केल्यानंतर कागलचे राजकारण कडाक्याच्या थंडीत चांगलेच तापले आहे. कागलमधील छापेमारी मागे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा हात असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. हा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी खोडून काढत मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे.

ते आज (दि. १४) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.समरजितसिंह घाटगे म्हणाले की, मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीच्या छापेमारीशी माझा काहीही संबंध नाही. या प्रकरणात मी कोणत्याही प्रकारे सहभागी नाही. चौकशीशी माझा काही संबंध नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामागे लपवून काही करण्याची मला गरज नाही. सोमय्यांच्या कामाचे श्रेय मी का घेऊ? मी त्यांना कागदपत्रे पुरविल्याचा आरोप केला जात आहे. परंतु सोमय्यांना कागदपत्रे पुरविण्याची गरज नाही. कारवाईवेळी मी दिल्लीला गेलो म्हणजे ईडीच्या कार्य़ालयात गेलो असा होत नाही. त्यांचे सर्व आरोप बालीश आहेत. मला काही त्यांच्याविरोधात करायचे आहे, ते पत्रकार परिषद घेऊन योग्यवेळी सांगेन.चौकशीला सामोरे जाण्याऐवजी मुश्रीफ केवळ स्टंट करत आहेत. आरोपांना मुश्रीफ उत्तरे देत नाहीत. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारे आता जातीचा आधार घेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांच्या कॅटगरीत बसवून घेत आहेत. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्याबद्दल मुश्रीफ यांना इतके प्रेम का आहे? असा सवाल समरजितसिंह यांनी यावेळी केला.मुश्रीफ यांना रात्री झोपेतही समरजितसिंह दिसू लागला आहे. पंचवीस वर्ष आमदार असणाऱ्यांना माझ्या कार्यकर्त्यांची आता दखल घ्यावी लागत आहे. माझे कार्यकर्तेही त्यांना आता स्वप्नामध्ये दिसू लागले आहेत. मुश्रीफांना कारवाईची माहिती होती म्हणून ते आदल्या रात्री मुंबईला गेले असे म्हणायचे का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला.मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर कुणीच दिली नव्हती. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. परंतु पुन्हा पुन्हा मुश्रीफ तेच ते सांगत आहेत. याच नवीन काहीच नाही. मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या छापेमारीमुळे त्यांना सहानुभूती मिळणार का? या प्रश्नावर समरजितसिंह म्हणाले हे जनता ठरवेल.