राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना गणेश विसर्जनदिनी विकत घेण्याचा प्रयत्न फसला ; म्हणून आता ईडीची कारवाई : अमोल मिटकरी

सिंदखेड : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना गणेश विसर्जन दिनी विकत घेण्याचा प्रयत्न फसला, म्हणून त्यांच्याविरुद्ध ‘ईडी’ची कारवाई करण्यात आल्याचा गौप्यस्फोट वजा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हा सवाल उपस्थित करून विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची बदनामी करण्याची सुपारी देण्यात आली आहे. मुळात ‘ईडी’च्या कारवाईंची माहिती त्यांना अगोदर कळायला ते काय ब्रम्हज्ञानी आहे का? असा परखड सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला.सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पिठासमोरील सुनावणीत सेनेचे बंडखोर आमदार अपात्र ठरतील व लगेच राज्य सरकार कोसळेल असे भाकीत त्यांनी यावेळी केले.

यामुळेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला आहे,असे ते म्हणाले. सिंदखेड आमदार कडू यांनी यामुळेच विस्तार करता येत नसेल तर नका करू पण किमान खोटं बोलू नका, असे मुख्यमंत्र्यांना सुनावले. त्यामुळे कडू यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी आपण केली आहे. हा अपघात की शासकीय घातपात याची चौकशी होण्याची गरज असल्याचे मिटकरी म्हणाले.