
कोल्हापूर : शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर अशा श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या कॉलेजमध्ये दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

उशिरापर्यंत लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे कंटाळलेले तसेच आतापर्यंतची मोठी सुट्टी उपभोगून आलेले विद्यार्थी, नव्या वर्षाची नवलाई, कॉलेज कॅम्पस मधील नवचैतन्य, मॉड्युलर लॅबस, परिपूर्ण सेटअप, सर्व सोयी सुविधा यामुळे पालक व विद्यार्थी आनंदात होते. संस्थेचे विकास अधिकारी व न्यू पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांनी संस्थेच्या परिचयाबरोबरच विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी मार्गदर्शन केले.

भावी आयुष्यातील स्वातंत्र्य व जबाबदारी यांचा मेळ साधून नियोजनबद्ध जीवनशैली व न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजचा अनुभव विद्यार्थ्यांचे भविष्य समृद्ध करेल याबाबत दाभोळे सरांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार सर यांनी फार्मसी शिक्षणाची उपयोगिता , करिअरच्या वेगवेगळ्या संधी , शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक बाबींबाबत मार्गदर्शन केले.
प्रा.पियुषा नेजदार मॅडम यांनी फार्मसी शिक्षणाची कार्यप्रणाली व शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम याबाबत विस्तृत विवेचन केले. प्रा. प्रवीण जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविकाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास व त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या सामाजिक जबाबदारीचे भान याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
