
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते.

पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.
पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.