काँग्रेसमुक्त भारत होऊच शकणार नाही : शरद पवार

मुंबई : काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा काही लोक करत आहेत. मात्र काँग्रेसमुक्त भारत होऊच शकणार नाही. काँग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही प्रमाणात आहेत.पण काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काँग्रेसमुक्त भारताच्या भाजपच्या घोषणेवर सडेतोड भाष्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर बुधवारी काँग्रेस भवनाला भेट दिली.

काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेसने दिलेल्या निमंत्रणानुसार पवार कार्यक्रमाला उपस्थित राहिले. काँग्रेस भवनातील आठवणी सांगताना त्यांनी काँग्रेसमुक्त भारत होऊ शकणार नाही, असे भाष्य केले.पवार म्हणाले की, कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागणार आहे. सत्ताधारी पक्ष देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आत्ताचे सरकार काँग्रेसविरोधी विद्वेषाची भावना कशी निर्माण होईल, या प्रयत्नात आहे. काँग्रेसचे विचार सोडता येणार नाहीत. वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भवनात येण्यासाठी निमंत्रण दिल्याबद्दल मी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो.काँग्रेस भवनात दाखल होतात काँग्रेस नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान पवारांनी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच सन २०१४ मध्ये लोकसभेच्या काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठीही पुण्यात आले असताना त्यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती.मी पहिल्यांदा सन १९५८ मध्ये काँग्रेस भवनात आलो. आज अनेक वर्षांनी पुन्हा येथे आलो. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असे त्यावेळीचे समीकरण होते. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे केंद्र इथेच होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून सुरू होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये काँग्रेस भवनाचे मोठे योगदान आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

🤙 8080365706