
कोल्हापूर : उदं गं आई उद’च्या नामघोषात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ओढ्यावरील रेणुका देवीची आंबिल यात्रा आज शनिवारी पारंपरिक व उत्साही वातावरणात पार पडत आहे.
कोल्हापूर शहर व परिसरातून कर्नाटकातील सौंदती येथे भरणाऱ्या रेणुका यात्रेसाठी हजारो भाविक जात असतात. येथील यात्रा संपल्यानंतर शहरातील जवाहरनगर येथील रेणुका देवीच्या मंदिरात आज (शनिवार) आंबिल यात्रा भरली असून पहाटे साडेतीन- चार वाजल्यापासूनच देवीच्या दर्शन आणि नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
देवीचे दर्शन सुलभरीत्या होण्यासाठी पुरुष व महिलांच्या स्वतंत्र दर्शन रांगा लावण्यात आल्या. देवीला भरलं वांगं, मेथीची भाजी, वडी, गाजर, कांदापात, लिंबू, केळ आणि भाकरीचा नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे.
कोल्हापूर शहरासह मंगळवार पेठ शिवाजी पेठ, बुधवार पेठ, जवाहरनगर, भीमनगर, संभाजीनगर, उद्यमनगर, रविवार पेठ, सम्राटनगर आदी भागातील महिला नैवेद्य घेऊन मंदिराकडे येत जातात. मंदिराच्या परिसरात विविध प्रकारची खेळणी, खाद्य पदार्थ व प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले असून अनेक महिलांनी नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओढयाच्या बाजूलाच सामूहिक भोजन करतात.
