नशामुक्तीसाठी युवा पिढीमध्ये  जनजागरण  करण्याचा समिती बैठकीत निर्णय

कोल्हापूर :केंद्रशासनाच्या  ‘नशामुक्त  अभियाना’ च्या  माध्यमातून युवापिढी मध्ये प्रभावी  पध्दतीने  व्यसनमुक्तीसाठी जनजागरण करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय  समितीच्या बैठकीत घेण्यात आला  आहे. 

समितीचे  अध्यक्षजिल्हाधिकारी राहूल रेखावार  यांच्या मान्यतेनंतर या सर्व उपक्रमांना अंतिम स्वरूप देण्याचे  बैठकीत निश्चित करण्यात आले. नशामुक्त  अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे  सदस्य सचिव,  जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक  घाटे यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी जिल्हा परिषदेमध्ये समितीची बैठक झाला. त्यामध्ये  नोव्हेंबर २०२३ पर्यंत  राबवण्याच्या उपक्रमांचा आराखडाही  तयार  करण्यात आला. 

यावेळी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनुष्का गुप्ता आणि अनू मौर्य यांची प्रमुख  उपस्थिती  होती.  कोल्हापूर शहरासह बाराही तालुक्यांमध्ये रॅलीच्या माध्यमातून जनजागरण, प्रदर्शने, व्याख्याने,  कार्यशाळा,  चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा याच्या  माध्यमातून नशामुक्तीसाठीचे वातावरण तयार करण्यासाठी  समिती  सदस्यांनी चर्चा केली.  

समिती  सदस्य आणि महात्मा  गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते समीर  देशपांडे  यांनी यावेळी व्यसनातून  बाहेर  पडून  यशस्वी जीवन जगणाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची,  अशांची माहिती  पुस्तिकेव्दारे  प्रसारित  करण्याबाबत  सुचना केली. समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित  करून  12 तालुक्यात  त्यांच्या  माध्यमातून जनजागरण  करावे  अशी  सुचना  सायबरचे  प्रा.सुरेश आपटे  यांनी  केली.        

कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  सहकार्याने  आरोग्य विभाग, महिला आणि बालविकास, माध्यमिक शिक्षण विभाग, शिवाजी  विद्यापीठ  यांच्यासह  विविध  स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व्यसनांचे होणारे गंभीर परिणाम समाजापर्यंत पोहोचवण्याचे यावेळी निश्चित  करण्यात  आले. यावेळी झालेल्या चर्चेत मिलिंद शिंदे, अक्षय पाटील, भिमराव टोणपे, प्रतिभा सावंत, पूजा धोत्रे, रविंद्र ठोकळ, आशा रावण, एस. बीटिपुगडे यांनी भाग घेतला.

🤙 8080365706