
कोल्हापूर: सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत मैत्री या तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या भेटीप्रसंगी बोलतांना या संस्थेच्या अध्यक्षा मयुरीताई आळवेकर यांनी तृतीयपंथीयांच्या जीवनातील विविध आव्हानात्मक प्रसंगाची मांडणी करतांना आमच्या समाजाप्रती विविध स्तरांवरुन विशेषतः समाजकल्याण खात्यामार्फत उपक्रम राबवले जात असून या सर्व सकारात्मक घटनांमुळे आमच्याही जीवनात परिवर्तन होत असल्याचे नमूद केले.

तृतीयपंथीयांसाठी अस्तित्वात आलेल्या २०१९ च्या कायद्याची व्यापाकपणे जनजागृती करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी समर्पकपणे दिली. या भेटीच्या सुरुवातीस सायबरचे समाजकार्य विभागप्रमुख डॉ. दीपक भोसले यांनी तृतीयपंथी समाजाची संवाद वाढणे हे गरजेचे असल्याचे सांगून अशा प्रयत्नांमधूनच या समाजाची वास्तविकता सर्वसामान्यांना समजण्यास मदत होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या तृतीयपंथी कार्यकर्त्यांचा प्रा. महेंद्र जनवाडे व विद्यार्थी प्रतिनिधींमार्फत तुळशीची रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अभिजीत शिंगाडे यांनी केले.
