कार्डधारक अपंग प्रवाश्यांना मोफत प्रवास पण…..

महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने शहरातील आणि शहराबाहेरील अपंग प्रवाश्यांसाठी अनुक्रमे मोफत आणि सवलतीत प्रवासाची योजना आखण्यात आली. यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून कार्ड घेणाऱ्या अपंग प्रवाश्यांना मोफत तर कार्ड नसलेल्या सर्व अपंग प्रवाश्यांना ७५ टक्के सवलतीत प्रवास करता येईल. मोफत प्रवास करणाऱ्यांना शून्य आणि सवलतीत प्रवास करणाऱ्यांना एक चतुर्थांश मूल्याचे तिकीट काढणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित प्रवासी विनातिकीट धरून कारवाई केली जाईल.

सवलतीत प्रवास करणाऱ्यांना तिकीट काढावेच लागणार आहे. पण मोफत प्रवासाचे कार्ड देऊन तिकीट काढणे अनिवार्य करण्यातून प्रशासन नेमके काय साधणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सिटीलिंक प्रशासनाने शहरात राहणार्या अपंग प्रवाश्यांसाठी मोफत प्रवासाची योजना तयार केली आहे त्या अंतर्गत आवश्यक ती कागदपत्रे देऊन कार्ड वितरित केली जात आहेत. या योजनेचा शहराच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या अपंग प्रवाश्यांना लाभ मिळत नव्हता. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन मोफत प्रवासाचे कार्ड नसलेल्या शहर वा शहराच्या हद्दीबाहेरील सर्व अपंग प्रवाशांना सिटीलिंकमधून प्रवास करताना पूर्वीप्रमाणे तिकिटात ७५ टक्के सवलत देण्याचे निश्चित केले आहे. एक डिसेंबर म्हणजे गुरूवारपासून या नव्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार आहे. परंतु, अपंग प्रवाशांना आधारकार्ड आणि शासनाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रवासावेळी सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. तसेच अपंगत्व हे ६५ टक्केपेक्षा जास्त असल्यास अश्या प्रवाश्यासोबत असलेल्या सहकारी प्रवाशास देखील तिकीटामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे.

🤙 9921334545