
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणं आगामी काळात काढण्यात येतील.

निधीची कोठेही कमतरता भासणार नाही. गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येईल. शिवरायांचा इतिहास आपल्याला प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल.
या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेत्यांची उपस्थिती होतीछत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अंगावर शहारे येतात. मला छत्रपतींचा भगवा झेंडा फडकवण्याचे भाग्य लाभले. आज येताना अनेक कार्यकर्ते, शिवभक्त रस्त्याने भेटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. विलक्षण आनंद होता. आपल्या महापराक्रमी राजाच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर आहे. इथली माती महाराजांचे शौर्य, पराक्रमाची साक्ष देते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.