जि. प. सोसायटीसह जिल्ह्यातील 21 सहकारी संस्थेच्या निवडणुकांना स्थगिती

कोल्हापूर : राज्यातील 7 751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या निवडणुकीची संख्या 7147 इतकी आहे. एकाच कालावधीत दोन्हीही निवडणुका होत असल्याने राज्याच्या सहकार विभागाने सहकारी संस्थेच्या निवडणुकीला 20 डिसेंबर अखेर स्थगिती दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद सोसायटी तसेच ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेसह 21 सहकारी संस्थेच्या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी सांगितले.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्यपरिस्थिती ७१४७ इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील सुरु करण्यात आला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेल्या ७१४७ सहकारी संस्थांपैकी “अ” वर्ग, ३८ “ब” वर्ग ११७०, “क” वर्गातील ३१५१ व “ड” वर्गातील २७८८ सहकारी संस्था आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाच कालावधीत सुरु असल्याने गावागावामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या सदस्यांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असून या वर्गातील सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यात सद्य:स्थितीत ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा सुरू असलेला कार्यक्रम, त्याचप्रमाणे, ७१४७ सहकारी संस्थांचा निवडणूकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, वर्ग “क”, “ड” तसेच, वर्ग “इ” प्रकारच्या सहकारी संस्था, त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी मा. उच्च/ मा. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून, राज्यातील “अ” व “ब” वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्यावर दिनांक २० डिसेंबर, २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

🤙 8080365706