
कोल्हापूर : उत्कृष्ट फुटबॉलपट्टू, यशस्वी उद्योजक, प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावून जाणारे मदतगार, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आदर्श सामाजिक नेतृत्व आणि कोल्हापूर शहराच्या विकासाचे व्हीजन घेऊन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, संस्कृतिक, उद्योग, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कर्तत्वाने ठसा उमटवलेले अष्टपैलू व्यक्तीमत्त्व व कोल्हापूर शहराचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधनामुळे कोल्हापूरचे औद्यागिक क्षेत्रामध्ये कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अशा भावना श्री सचिन शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालकएसबी रेशलर्स प्रा. लि. कोल्हापूर. यांनी व्यक्त केल्या.
चंद्रकांत जाधव हे आमचे जवळचे उद्योजक मित्र होते. गोशीमाच्या माध्यमातून माझी व त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. एक मनमिळाऊ, दिलदार, प्रेमळ, समजुतदार, अभ्यासू, शांत व संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख थक्क करणारा आहे. दोन लेथ मशिन एकावेळी चालविणाऱ्या चंद्रकांतनी पाहता पाहता कोट्यवधींची जाधव इंडस्ट्रीज उभा केली. दहा देशांत निर्यातीपर्यंत मजल मारली. एक दोन नव्हे तर उद्योजकांच्या ५ संघटनांवर वेगवेगळ्या पदावर काम केले. आठशे-हजार तरुणांच्या हाताला काम दिले. स्वतः सारखे तळागळातील तरुण उद्योजक बनले पाहिजेत, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.एक फुटबॉलपटू, तालमी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कोल्हापुरकरांनी, पेठा-पेठातल्या मतदारांनी त्यांना अवघ्या वीस दिवसात आमदार केले. कोल्हापुरचा ‘आमदार’ ही मानाची गोष्ट. पण हा मान घेवून चंद्रकांत जाधव मिरवताना दिसले नाहीत. मोजकं बोलणं पण जनतेशी अधिक संवादी राहणं त्यांचा स्वभाव होता. शुन्यातून यशस्वी उद्योजक नंतर आमदारकी मिळवलेले आण्णा कायम जमिनीवर राहिले. कोल्हापूरी रांगडेपणा त्याच्यात वरुन दिसत नव्हता. ते मृदू होते. पण कामाचा धडाका मात्र कायम अंगी होता. महापूर, कोरोना महामारी या मोठ्या संकट काळात ही ते कायम लोकांच्यात राहिले. आपल्या मतदारसंघाच भलं व्हावं यासाठी धडपडत राहिले. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी आण्णांचे सुरू असलेली धडपड आम्ही जवळून पाहिलेली आहे. वीज दरवाढीचा प्रश्न, एमआयडीसीतील बांधकाम व जागेचा प्रश्न अशा विविध समस्या त्यांनी शासनापर्यंत पोचवल्या. तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून खूप कमी काळ त्यांना काम करण्याची संधी मिळाली. कोल्हापुरातील उद्योजकांचा आवाज म्हणून विधानसभेत पोहोचलेले चंद्रकांत जाधव यांना नियतीने हिरावून नेले. श्री सचिन शिरगावकर, व्यवस्थापकीय संचालकएसबी रेशलर्स प्रा. लि. कोल्हापूर
