रुकडी ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात उपोषण  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुकडी येथील ग्रामविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांची  नियुक्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हापरिषदेसमोर उपोषण करण्यात आले. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, रुकडी गावामध्ये सन २०१५-१६ ते सन २०१७-१८ पर्यंत  शिवाजी परसू कांबळे हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. सदर कालावधीमध्ये त्यांनी चौदावा वित्त आयोग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार केला होता. ही माहिती ग्रामस्थांना समजताच त्याविरोधात उपोषण केले होते. हा अपहार सिद्ध होऊनही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई आजतागायत झाली नाही. उलट राजकीय दबाव आणून आणि शासकीय नियमाविरुद्ध जाऊन रुकडी येथे या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे.

या अगोदरही येथील ग्रामस्थांनी या अधिकाऱ्या विरोधात उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी भालेराव यांनी स्वतः कारवाईचे लेखी आश्वासन देऊन ग्रामस्थांचे उपोषण सोडवले होते. या अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी आणि त्यांची कसबा रुकडी येथे केलेली तात्पुरती बेकायदेशीर नियुक्ती रद्द करून गावासाठी एक चांगला ग्रामविकास अधिकारी मिळण्यासाठी संजय कांबळे आणि इतर ग्रामस्थांचे १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

🤙 8080365706