भारत आणि डेन्मार्कने एकत्र काम करण्याची गरज-डॉ.चेतन नरके

कोल्हापूर (प्रतिनिधी): दुधाचा उत्पादन खर्च कमी करून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन, संकलन आणि प्रक्रिया या सर्व क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क या देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इंडिअन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी केले. डेन्मार्क सरकारच्या वतीने मुंबई येथे इंडो-डॅनिश बिझनेस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत भारत आणि डेन्मार्क या दोन देशांमध्ये डेअरी उद्योगा संदर्भात एकत्रित सहभाग वाढवण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली. डेअरी फार्म मॅनेजमेंट, चांगल्या वाणांचे प्रजनन वाढवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे सीमेन, बायोगॅस प्लांट, पशु खाद्यामध्ये नवे संशोधन,मिथेन वायूचे उत्सर्जन कमी करण्याच्या अनुषंगाने पशुखाद्याच्या गुणवत्तेत बदल या विषयांवर काम करत या क्षेत्रातील माहिती आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणी सोबत एकत्रित प्रकल्प राबवण्याची संधी यावर सखोल चर्चा त्यांनी केली. 

पाश्चरायजिंग सह डेअरी तंत्रज्ञान आणि त्याच्याशी निगडीत यंत्रसामुग्री निर्मितीत डेन्मार्क जगभरात आघाडीवर आहे. भारतात सर्वात पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादनासाठी सर्वात जास्त संधी आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. यामध्ये शेतमजूर, अल्पभूधारक यांचे योगदान मोठे आहे. या घटकांना फायदेशीर दूध उत्पादनातून प्रोत्साहित करण्यासाठी दुधाची प्रती लिटर उत्पादन मूल्य कमी करून गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी नवं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डेन्मार्क आणि भारत या दोन्ही देशांनी  एकत्र काम करण्याची गरज सल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी डेन्मार्कच्या अन्न आणि कृषी मंत्रालयाचे प्रकल्प प्रमुख सायमन मॉलर, मार्कस निल्सेन, डॅनिश एम्बसीचे  मार्टिन बेहबाहनी चितळे डेअरीचे गिरीश चितळे, सारंगधर निर्मल, डॉ. प्रबोध हळदे, संजीव पैठणकर, योगेश गोडबोले यांच्यासह भारत आणि डेन्मार्क मधील कृषी आणि डेअरी उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध क्षेत्रातील गुंतवणूक आणि सामंजस्य करार करण्यासाठी पुढील महिन्यात डेन्मार्क सरकारच्या मंत्रालयाचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे,या शिष्टमंडळाने चर्चेसाठी डॉ.चेतन नरके यांना आमंत्रित केले आहे.