गांधीनगर : गांधीनगर मेनरोडवर निगडेवाडी कॉर्नरला अपघाताचे प्रमाण वाढले असून या ठिकाणी आणखी जीवीतहानीची वाट न पाहता येथे गतीरोधक तसेच वेगमर्यादा फलक बसवा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.

गांधीनगर ही होलसेल व रिटेलची मुख्य बाजारपेठ असल्याने येथे वाहनांची मोठी रेलचेल असते तसेच संपूर्ण गांधीनगर मेन रोडवर वाहनांची वेगमर्यादा जास्त असते त्या ठिकाणीही आपण पाहणी करून गतिरोधक करावेत. सूर्या कॉम्प्लेक्स ते निगडेवाडी स्वागत कमान म्हणजेच निगडेवाडी कॉर्नरला अपघात वाढले आहेत. या कॉर्नरवर नुकताच एक अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पॅसेंजर रिक्षाचालकाने ब्रेक लावल्याने रिक्षातील एक महिला रिक्षातून उडून रस्त्यावर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर मार बसला. ही महिला कोसळतान तिचा जोरदार धक्का एका दुचाकीस्वाराला बसला. त्यात दुचाकीस्वराच्या हाताचा पंजा रक्तबंबाळ झाला. या दोघांनाही शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वीही येथे अनेक गंभीर अपघात झाले आहेत. एक भरधाव कारने रस्त्याचा कठडा तोडला होता. रस्त्यावरील व्यापारी त्यामुळे भयभीत झाले होते. चार-पाच दिवसापूर्वी झालेल्या अपघाताने तर ग्राहक व व्यापारी वर्गात तीचे वातावरण आहे. या ठिकाणी सारखे अपघात होत असल्याने तेथे गतीरोधक बसवण्याची मागणी यापुर्वीही करण्यात आली होती. प्रसिध्दी माध्यमांनीही याबाबत आवाज उठवला होता. त्यावेळी रस्त्याचे काम झाल्यानंतर तेथे गतिरोधकाची किंवा अन्य पर्यायाची तरतूद करू असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. इथे अपघात नेहमी होतात, त्याचा प्रतिबंध व्हावा म्हणून पोलीस यंत्रणेनेही योग्य ती उपाययोजना करावी म्हणून आपल्या विभागाला कळवले होते. पण आता रस्ता होऊनही गतिरोधक बसवलेले नाहीत. वेग मर्यादिचे फलक ही लावण्यात आलेले नाहीत. इतके अपघात होऊन सुध्दा आपल्या विभागाला जाग आलेली नाही. आणखी किती जणांचे आपण अपघात पाहणार आहात?आणखी किती दुर्घटनांची प्रतीक्षा करणार आहात? याबाबत आपल्याकडून खुलासा होण्याची नितांत गरज आहे. याठिकाणी येत्या आठ दिवसात गतिरोधक अथवा अन्य पर्यायी व्यवस्था केली गेली नाही तर जन आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल.
या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले. हे निवेदन उप कार्यकारी अभियंता, श्रीधर घाडगे यांनी स्वीकारले. यावेळी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच यावर कार्यवाही सुरू करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, मा. उप तालुकाप्रमुख विक्रम चौगुले, फेरीवाला संघटनेचे तालुकाप्रमुख कैलास जाधव व उप तालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, विभागप्रमुख दिपक पोपटाणी(फ्रेमवाला), शाखाप्रमुख दिपक अंकल, सुनिल पारपाणी, पै. बाबुराव पाटील, अजित चव्हाण, भुषण चौगुले, किशोर कामरा, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.