कोल्हापूर (प्रतिनिधी) :सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह आठ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

सहा वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा व निवडणूक अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हा खटला होता. कागल पोलीस स्थानकात राजकीय वैमनस्यातून हा गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, नवीद मुश्रीफ, भैया माने, प्रकाश गाडेकर यांच्यासह इरफान मुजावर, रमेश माळी, अशोक जकाते, विक्रम जाधव, श्रीमती आशाकाकी माने या सर्वांवर हा गुन्हा दाखल झाला होता. १० नोव्हेंबर २०१६ रोजी सौ. अलका मर्दाने यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी व तत्कालीन प्रांताधिकारी सौ. मनीषा कुंभार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार झाली होती. तसेच, विनाकारण बेकायदेशीररित्या जमाव जमवून निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात घुसून सरकारी कामात अडथळा आणल्याचेही कलम दाखल केले होते.
हा खटला मे. एस. एस. जगताप यांच्या न्यायालयात चालून यामध्ये फिर्यादी संजय वळवी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती टीना गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मनीषा कुंभार यांच्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या. या सर्वांच्यावतीने ॲड. गिरीश के. नाईक यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला व या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. यांच्यावतीने ॲड. गिरीश के. नाईक, ॲड. इमरान शेख, ॲड. आदिती चोरगे, ॲड. योगेश सावंत यांनी काम पाहिले.