कोल्हापूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी मेळावा घेऊन जिल्हयात मोठा राजकीय स्फोट घडवला.या मेळाव्यातुन ए.वाय पाटील यांनी पक्षश्रेष्ठींवरील आपली नाराजी दाखवून दिली.

ए.वाय पाटील यांच्या या भूमिकेनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलच तापलं आहे.पाटील यांच्या भूमिकेनंतर गोकुळचे ज्येष्ठ नेते अरूण नरके यांचे चिरंजीव आणि गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे राजकीय वाटचाल सुरू आहे.

नुकतीच नरके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिपावली शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने बारामती येथे भेट घेतली. तर ए.वाय.पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील मुक्कामी भेट घेतली आहे. त्यामुळे ए.वाय.पाटील ढाल तलवार हाती घेणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोठात आता अस्वस्थता पसरली आहे. ए.वाय यांच्यामुळे उठलेले वादळ शांत करण्यासाठी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन पाटील यांना थांबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केलेत. पण त्यास यश येईल अशी परिस्थिती नाही.
गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके यांनी मोठा राजकीय पवित्रा घेतला असून दिल्ली स्वारी अर्थात लोकसभा उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक ते राष्ट्रवादी कडून लढवणार असल्याचे समजते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लोकसभा उमेदवारीसाठी साकडे घातल्याचे समजते. या दोन दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून यामुळे अनेकांना हादरा बसणार हे निश्चित आहे.