मुंबई (वृत्तसंस्था) : नोटेवर फोटो कोणता हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही. शिवसेना हा गरिबांचा पक्ष आहे, त्यामुळे या सगळ्या भानगडीत शिवसेना जात नाही. परंतु जर मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी तर सांगेन बाळासाहेबांचा असायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माझा नेता असायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल, तर मी तर शिवसेनेचा आहे. मला तर असंच वाटेल की बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे. पण माझ्या वाटण्याला काही महत्त्व नाही. शेवटी हे सरकार ठरवत असतं की त्यावर काय असायला पाहिजे, हे जाणूनबुजून निर्माण केलेले वाद आहेत असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

पुढे बोलताना परब म्हणाले की, याशिवाय या गोष्टींवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे की, आपला रुपया घरसतोय. निर्मला सीतारामन यांनी यावर असं सांगितलय की, रुपया घसरत नाहीए डॉलर मजबुत होतोय. यावर आपण बघताय व्हॉट्स अॅपवर बरेचसे मेसेज फिरत आहेत. विविध पद्धतीने त्यावर टीका होते आहे. परंतु आपल्या देशाचं मूल्यमापन हे आपल्या रुपयावरती अवलंबून असतं आणि तो केवळ रुपया घसरत नाही तर देश घसरतोय. त्यामुळे सरकारने याची काळजी घेतली पाहजे असं एक सर्वसाधरण नागरिक म्हणून, करदाता म्हणून मला वाटतं असंही परब यांनी यावेळी सांगितलं.