कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिव-शाहू आघाडी उतरणार असल्याची घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. येथील शासकीय विश्रामगृहात आज (गुरुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही घोषणा केली.

पदवीधर मतदार संघातील एकूण १० जागा लढविण्यासंदर्भात एकमत झालं असून जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितले.
शिवाजी विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढविण्याचा निर्णय ठाकरे गटाने प्रथमच घेतला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटासोबत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटा, त्याचबरोबर ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी एकत्र येत सिनेट निवडणूक शिव-शाहू आघाडीच्या माध्यमातून लढविणार आहेत.
या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. चार विद्याशाखांमधील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमध्ये १ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जाती, जमातीसाठी आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेला १ जागा खुल्या प्रवर्गातील महिला तर दुसरी जागा भटक्या विमुक्त यांच्यासाठी आहे. मानव्य विद्याशाखेतील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेमधील १ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, ओबीसी साठी १ जागा राखीव आहे. या निवनुकीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेस ठाकरे गट, सुटाचे कार्यवाह प्राध्यापक डी.एन पाटी, ऑल इंडिया युथ स्टुडंट फेडरेशन आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.