प्रयाग चिखली (प्रतिनिधी) : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील रजपुतवाडी (ता.करवीर) येथील रस्तावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. हे खड्डे लक्षात येण्यासाठी येथील तरुणांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावली आहेत. तरीही याकडे महामार्ग अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवासांमधून याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर शिवाजी पुल ते रजपुतवाडीपर्यंत ठीक ठिकाणी रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात झाले असून प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, शिवाजी पुल,आंबेवाडी आणि रजपुतवाडी येथील खड्ड्यांमुळे गेल्या महिनाभरात सुमारे २१ लहान-मोठे अपघात झाले आहेत. या स्थितीबाबत संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांना नागरिक व प्रवाशांनी माहिती दिली आहे. तरीदेखील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिक व प्रवासांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.रजपूतवाडी येथे गेल्या पंधरा दिवसात या खड्ड्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी महापालिकेची उपलब्ध बॅरिकेट्स निम्म्या रस्त्यावर लावून रस्त्यामध्ये असणारे खड्डे प्रवाशांच्या लक्षात यावेत याकरिता प्रयत्न केले आहेत.
रजपुतवाडी ग्रामस्थांनी व पत्रकारांनी या स्थितीबाबत या महामार्गावर सध्या देखरेख करणारे महामार्ग अधिकारी व्ही.एन.पाटील यांना फोनवरून याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही सोय लावण्यात त्यांनी असमर्थता दर्शवून उलट उद्धट उत्तरे देत फोन कट केल. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या ठिकाणी बॅरिकेट्स लावून महामार्ग अधिकाऱ्याचा निषेध केला. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक अपघात होऊन देखील संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांनी कोणतीही चौकशी केली नाही शिवाय भेट ही दिलेली नाही. पूरस्थितीमुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला दिवस आणि रात्र ही वैऱ्याची ठरत आहे.
या मार्गावर प्रचंड रहदारी असून अनेक लहान-मोठी वाहने भार्गव वेगाने असतात. बऱ्याच वेळा रस्त्यात पडलेले खड्डे प्रवाशांच्या लक्षात येत नाहीत.त्यामुळे क्षणाक्षणाला अपघातीची शक्यता वाढत आहे.अनेक वाहन चालकांमध्ये या ठिकाणी वाद निर्माण होत आहेत. गेल्या दोन दिवसापासून रस्त्यावर लावलेली बॅरिकेट्स ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावली असून याकडेही महामार्ग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत.मात्र वडणगे फाटा, आंबेवाडी आणि रजपुतवाडी या तीन ठिकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले आहेत. येथील तात्काळ दुरुस्ती आवश्यक आहे.