गोरगरिबांची सेवा आणि कल्याण हेच अंतिम ध्येय-आ.हसन मुश्रीफ

अर्जुनवाडा (प्रतिनिधी) : मी,खासदार संजय मंडलिक आणि संजयबाबा घाटगे असे तिघेही गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहोत असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे, असेही ते म्हणाले. अर्जुनवाडा (ता. कागल) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रा.संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयासह दोन कोटी रुपयांच्या विकासकामांची उद्घाटने व प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास मंत्री झाल्यावर विकासनिधी आणलाच. शिवाय ४२  महत्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये राज्यभर सहा जुनला शिवस्वराज्य दिन, सैनिकांचा मालमत्ता कर माफ आणि विधवांचा सन्मान कायदा यांचा समावेश आहे. विकासकामांची यादी वाचतो, नाहीतर सत्ता आली म्हणून बिळातून आता बाहेर आलेले ही सगळी कामे मीच केली म्हणतील, अशी टिकाही त्यांनी केली.

यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक म्हणाले, कागल तालुक्याच्या विकासाच्या ज्या-ज्या मागण्या होत्या, त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. गोरगरीब जनतेचे भलं व्हावं हीच भूमिका घेऊन, कागल तालुक्याचा नावलौकिक वाढवण्यासाठीच आम्ही सर्वजण काम करीत आहोत, असेही ते म्हणाले. राजकराण काही असले, तरी लोकाभिमुख निर्णय झाले पाहीजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत.

यावेळी बोलताना माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ हे संवेदनशील नेते आहेत, म्हणूनच सतत २५ वर्षे ते निवडून येतात. सार्वजनिक जीवनात नेतृत्व करायला मिळते म्हणजे आपल्यावर जनतेचे अनंत उपकार असतात. यावेळी भारत सातवेकर, आर. के. लाडगावकर, शशिकांत खोत यांचीही भाषणे झाली. ग्रामपंचायत कार्यालयासह, माळवाडी पुल, हनुमान मंदिर सभागृह आदी कामांची उद्घाटने झाली.

सूत्रसंचालक विशाल कुंभार यांनी तिन्ही नेत्यांचा उल्लेख ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर असा केला. हा धागा पकडत आमदार मुश्रीफ म्हणाले,आम्ही देव नाही, आम्हाला देवत्व देऊ नका. आम्ही ही सामान्य माणसे आहोत. गोरगरिबांची सेवा आणि कल्याण हेच आमचे आयुष्याचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठीच उभी हयात खर्ची घालणार आहोत.   

व्यासपीठावर भैया माने, उपसरपंच अजितकुमार पाटील, आर.के.लाडगावकर,आर. एस.पाटील,भारत साठे, प्रमोद कुंभार,ग्रामसेवक पी.बी.कांबळे,वसंत करवीरकर आदी उपस्थित होते. विशाल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सरपंच प्रदीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.

🤙 9921334545