कोल्हापूर (प्रतिनिधी) :जल जीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयामध्ये पाणी पुरवठयाची कामे सुरू आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावी यासाठी ग्राम पंचायत स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे व ग्रामसेवकांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने या सदस्यांसाठी ‘ग्रामस्तरीय क्षमता बांधणी’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवारी) संपन्न झाला.

जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या योजना या पुढील 30 वर्षे कालवधीसाठी करावयाच्या असल्याने योजनेचे काम हे गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे यामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता समितीची भुमिका अत्यंत महत्वाची असून ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण खुप महत्वाचे असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समिती सदस्यांसोबतचं महिलांचा सहभाग ही महत्वाचा आहे. योजना दिर्घकालीन चालावी यासाठी वॉटर मीटर ही एक महत्वाची संकल्पना सर्व ग्राम पंचायतींनी अमलात आणावी. पाणी गुणवत्तेसाठी नियमित पाणी शुध्दीकरण करून पाणी पुरवठा करावा, पाण्याची टाकी व जलस्त्रोत परिसर नियमित स्वच्छ ठेवण्यात यावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शिनी मोरे यांनी केले. यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नवीन धोरणानुसार प्रतिव्यक्ती, प्रतिदिन 55 प्रमाणे नळाव्दारे शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी गावस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची जबाबदारी व महत्व विषद केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांचे समन्वयाने शासनाने नेमलेल्या मनवेल बारदेस्कर एज्युकेशन सोसायटी, गारगोटी या संस्थेमार्फत पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या सदस्यांना 2 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात पन्हाळा, करवीर आणि गगनबावडा या तालुक्यातील एकूण 11 गावातील समिती सदस्य हे प्रशिक्षणासाठी उपस्थित होते. प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रमाचे आभार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी मानले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ, सल्लागार उपस्थित होते.