कोल्हापूर (प्रतिनिधी) :विरोधी आघाडीच्या संचालिका महाडिक यांनी उलटसुलट विधाने करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करू नये.तसेच मुंबईतील दूध पॅकिंगवरुन सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीवर केलेली टीका निराधार असल्याचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.महाडिक यांनी उपस्थित केलेल्या टीका या निरर्थक असून वस्तुस्थिती खरी नाही.शौमिका महाडिक यांच्या आरोपात तथ्य नसल्याने अश्या तथ्यहीन प्रश्नांना उत्तरे देण्यास आम्ही बांधील नाही असंही चेअरमन पाटील यांनी म्हंटले आहे.
गोकुळमधील सत्ता परिवर्तनानंतर नव्या संचालक मंडळाने प्रारंभापासूनच दूध उत्पादकांच्या हिताचा आणि काटकसरीचा कारभार केला आहे. गोकुळच्या खर्चात बचत होवून तो पैसा दूध दराच्या माध्यमातून उत्पादकांच्या पदरात पडेल या विचाराने महानंदासोबत पॅकिंगचा करार केला. राज्यातील घडामोडीतून महानंदावर प्रशासकाची नेमणूक,महानदांच्या प्रशासनाने दूध पॅकिंग संदर्भात दाखविलेली असमर्थता व वितरण व्यवस्थेतील तक्रारी या कारणास्तव गोकुळला दूध पॅकिंग व्यवस्था बघणे महत्त्वाचे होते. म्हणून इग्लू डेअरीच्या तुर्भे येथील कंपनीला मुंबईतील दूध पॅकिंगचा ठेका तात्पुरत्या कालवधीसाठी दिला आहे. यामध्ये गोकुळ दूध संघाला बारा कोटी रुपयांचा तोटा होण्याचा प्रश्नच संभवत नाही असा खुलासा गोकुळ दूध संघातर्फे करण्यात आला आहे.
मुळातच महानंदाला पॅकिंगचा ठेका देण्याचा निर्णय संघाच्या हिताला धरून नव्हता काय ?
इग्लू डेअरीसोबतचा गोकुळचा पॅकिंगचा करार ३१ मे २०२१ रोजी संपला. इग्लूने ७ जुलै २०२१ रोजीच्या पत्राद्वारे संघास १५ जुलै २०२१ पासून पॅकिंग व्यवस्था बंद करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे संघास कळविले.सध्या संघाकडे स्वमालकीच्या इमारतीमध्ये ५ लाख ५० हजार लिटर दूध पेक्षा जास्त पॅकिंग क्षमता आहे. उर्वरित दोन ते अडीच लाख लिटर इतर ठिकाणी पॅकिंग करून घ्यावे लागते. नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढी क्षमता असलेला एकही प्लँट नसल्याने तत्कालीन दुग्धविकासमंत्री व महानंदाचे चेअरमन यांच्या सहकार्याने महानंदाबरोबर करार करून दिला. या करारातून संघास कोणतेही नुकसान झालेले नाही तो निर्णय संघहिताचाच होता. पूर्वीचे इग्लू कंपनीचे वाशी येथील युनिट सध्या बंद स्थितीतच आहे. त्यांनी तो प्लँट विक्रीस हि काढला आहे.
महानंदाला ठेका देण्याचा निणर्य घेऊन ही मंडळी बचत करत होती तर आता पुन्हा इग्लूला ठेका देवून नुकसान का करत आहेत ?
महानंदाकडील पॅकिंग सुरू केले व काही काळ पॅकिंग सुरळीत चालू होते. राज्यातील सत्ताबदलानंतर महानंदावर प्रशासक नेमण्यात आले. गोकुळच्या दूध पॅकिंग हाताळणी व संघाच्या वितरकांना वेळेवर दूध न देणे याचा परिणाम गोकुळच्या दूध वितरण व्यवस्थेवर होत असल्याचे निदर्शनास आले.मुंबईतील गोकुळच्या वितरकांनी लेखी तक्रारी गोकुळ प्रशासनाकडे वारंवार दिल्या आहेत याबाबतीत महानंदाच्या प्रशासनाला वेळोवेळी संघाकडून वितरणाच्या तक्रारी नुसार वेळोवेळी लेखी कळविले आहे. परंतु तेथील प्रशासनाने त्याबाबत कोणतेही सूचनेचे पालन न केल्याने हा करार रद्द करण्याच्या संदर्भात संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये चर्चा करण्यात आली व करार रद्द करण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केला असता महानंदाच्या प्रशासनाने गोकुळला सांगितले की तुम्ही पर्यायी व्यवस्था पहावी.महानदांच्या कर्मचाऱ्यांनी दूध पॅकिंग करण्यास असमर्थता दर्शवली आहे या कारणास्तव आपल्याला तात्काळ दूध पॅकिंग व्यवस्था बघणे महत्त्वाचे होते. यासाठी विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दोन ते अडीच लाख लिटर पॅकिंग क्षमतेचा तुर्भे (मुंबई) येथे असणारे इग्लू युनिट येथे असणारे मॅनेजमेंटने पॅकिंग करून देण्यास समर्थता दर्शवली.
संघाच्या स्वमालकीचा नवीन पॅकिंग सेंटर कार्यान्वित होण्यासाठी ६ महिने कालावधी लागण्याची शक्यता असल्याने तात्पुरता कालावधी साठी पॅकिंग करून घेत असल्याचे सांगितले. ग्राहकांना वेळेत व गुणवत्ता पूर्ण दूध उपलब्ध करून देणे हे संघाचे उद्दिष्ट असून ज्या त्या परिस्थितीनुसार संचालक मंडळ निर्णय घेत असते.