कोल्हापूर : मुंबई येथील पॅकिंगचा ठेका महानंदाकडून काढून इग्लू कंपनीला का दिला ? असा सवाल करत चुकीच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघांला झालेल्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण ?, असा सवाल गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे.
महाडिक म्हणाल्या, मुंबई येथील पॅकिंगचा ठेका पुन्हा ‘इग्लू’ कंपनीकडे देण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे समजते. मुळातच महानंदाला पॅकिंगचा ठेका देण्याचा निर्णय संघाच्या हिताला धरून नव्हता, हे मी वारंवार सत्ताधारी मंडळींना सांगण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे मी हा निर्णय चुकीचा असून, यामुळे संघाला जवळपास १२ कोटींचा तोटा सहन करावा लागेल हेही सांगितले होते. पण आम्ही कसा चोख कारभार करतो, हे दाखविण्यासाठी हा निर्णय बरोबरच असल्याचे वक्तव्य अनेकदा सत्ताधाऱ्यांनी केले. मध्यंतरी या निर्णयामुळे आम्ही संघाच्या पैशात बचत केली असल्याचेही सांगण्यात आले. त्याचे सर्व व्हिडीओ आपण पाहिले असावेत. मग आता अचानक पुन्हा महानंदाकडून ठेका काढून इग्लूला का दिला ? याचंही उत्तर त्यांनी दूध उत्पादकांना द्यावं.
त्या पुढे म्हणाल्या, महानंदाला ठेका देण्याचा निर्णय घेऊन जर ही लोकं बचत करत होती, तर आता पुन्हा मग इग्लूला ठेका देऊन नुकसान (त्यांच्या मतानुसार) का करत आहेत ? आणि जर खरंच महानंदा मुळे नुकसान सहन करावा लागतोय म्हणून आता ते निर्णय बदलत असतील तर मग वर्षभरात झालेल्या जवळपास १२ कोटींच्या तोट्याची जबाबदारी कोणाची ? हेच पैसे वाचवून दिवाळीला दुध उत्पादकांना तब्बल १२ कोटी रुपये जास्त देता आले असते, पण जाणीवपूर्वक हे नुकसान केले गेले. त्यामुळे आता सतेज पाटील यांनीच त्या रकमेची भरपाई करावी आणि दूध उत्पादकांच्या हक्काचे पैसे परत करावेत. नसेल तर महानंदाकडे वर्षभरात किती पॅकिंग लॉस झाला ? प्रति लिटर पॅकिंगसाठी येणारा खर्च किती होता ? ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढल्याने किती भार सोसावा लागला, या सगळयाचं सविस्तर विश्लेषण त्यांनी द्यावं.
महाडिक म्हणाल्या, एकीकडे चेअरमन निर्णय घेऊन कशी बचत केली हे सांगत होते आणि दुसरीकडे यांचे नेते सतेज पाटील विधिमंडळात बोलताना म्हणाले की , फक्त सहकार टिकावा म्हणून आम्ही तोटा सहन करून महानंदाला पॅकिंग दिलं आहे. बाप रे ! किती हा विरोधाभास ? आणि काय तो सहकाराचा कळवळा असल्याचं ढोंग! आता अचानक हा कळवळा कसा काय कमी झाला ? महानंदामधील काँग्रेसची मक्तेदारी संपली म्हणून आता सतेज पाटलांचा तिथला सहकाराचा कळवळा पण संपला का ? आज मी फक्त प्रश्न विचारतेय, पण वेळ आल्यावर संघाचा तोटा करून तिथे पॅकिंग करून घेण्यात कोणाचे व्यक्तिगत हितसंबंध गुंतले होते हेही सांगेनच. या तात्पुरत्या सत्ताधाऱ्यांवर आज एक निर्णय माघारी घ्यायची वेळ आली, पण यानिमित्ताने त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला. मागील दीड-एक वर्ष सातत्याने मी असे अनेक विषय मांडत आले आहे. तेव्हा माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष करून राजकीय सूडबुद्धीने निर्णय घेतले गेले. अश्या सर्व निर्णयांमुळे संघाचे किती नुकसान झाले आणि कोणा-कोणाचा व्यक्तीगत फायदा झाला याचा पुराव्यासह खुलासा लवकरच पत्रकार परिषदेत करेन. आणि त्याच्याही पुढे एक पाऊल जाऊन माझं सतेज पाटील आणि विश्वास पाटील यांना आव्हान आहे की, जर चोख कारभार केला असेल तर यावेळीही कोणाच्या तरी नावाने पत्रक काढून विषयाला बगल देण्यापेक्षा त्यांनी समोरासमोर एका व्यासपीठावर यावं. जिल्ह्यातील दूध उत्पादकाला सत्य कळावं यासाठी मी निश्चितपणे त्या व्यासपीठावर येईन.