कागल (प्रतिनिधी) : कागल शहरातील अतिक्रमित घरांचे नियमितीकरणाचा प्रस्ताव गेली वीस वर्षे प्रलंबित आहे. मुख्याधिकारी व अभियंता या बाबतीत राजकीय दबावामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळू देत नसल्याने नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यांच्याकडील प्रलंबित नियमितीकरणाचे प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी ताब्यात घ्यावेत. सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन अतिक्रमणधारकांना न्याय द्यावा.अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना शहरातील ११७ अतिक्रमणधारक नागरिकांनी दिले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी सुध्दा या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही पाठविल्या आहेत.
कागल शहरातील गट क्रमांक २४८/अ वड्डवाडी येथील ४२,गट क्रमांक ३४५/अ व ब मधील बिरदेव वसाहत, रेल्वे लाईन येथील ७५ अशी एकुण ११७ घरे अतिक्रमीत आहेत. या अतिक्रमित घरांचे नियमितीकरण करणेबाबतचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपूर्वीपासून कागल नागरपरिषदेकडे प्रलंबित राहिलेला आहे. याबाबत वारंवार तगादा, मागणी करून देखील अद्याप या घरांचे नियमितीकरण झालेले नाही. ही सर्व घरे १९९५ पूर्वीपासून सदर जागेवर वास्तव्यास आहेत. या सर्व घराना नगरपरिषदेने वीज, पाणी पुरवठा, घरफाळा, पाणीपट्टी, गटर व रस्ते, शौचालय अनुदान आदी सुविधा दिलेल्या आहेत. या घरांचे नियमितीकरण करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावामध्ये सदर जागेची रीतसर भूमापन कार्यालयाकडून मोजणी करून सदर जागेचा ले-आऊट तयार करून मूळ प्रस्तावासोबत समाविष्ट करण्यात आलेला आहे व सदर ले आऊंट मध्ये वहिवाटीप्रमाने प्रत्येकाचे क्षेत्रफळ दर्शवण्यात आलेले असून त्या अनुषंगाने शासकीय मूल्यांकनाची रक्कम संबंधित भोगावाटदारांनी भरण्याची तयारी दर्शवलेली आहे. तथापि काही तकलादू तथा – गैरलागू कारणांचा आधार घेऊन राजकीय दृष्टिकोनातून नियमितीकरणाचे काम आजतागायत प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे. अश्या प्रकारे नियमितीकरणाचा परिपूर्ण प्रस्ताव दाखल करून देखील केवळ राजकीय सूडबुद्धीने या सामान्य नागरिकांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. विशेष म्हणजे या सर्व जागांवर नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसल्याची बाब या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रेखावार यांच्या निदर्शनास आणून दिली.या निवेदनावर अतिक्रमणधारकांच्या सह्या आहेत.
यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, राजे बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, आप्पासो भोसले,आप्पासो हुच्चे, रणजीत पाटील, गजानन माने, सचिन मोकाशी, सागर पवार,हिदायत नायकवडी यांच्यासह अतिक्रमणधारक उपस्थित होते.
कोल्हापूर येथे कागलमधील अतिक्रमणधारकांचे नियमितीकरणाचे प्रस्ताव ताब्यात घेऊन न्याय देण्याच्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देताना शिष्टमंडळ