…अन्यथा वीस गावांचा रास्ता रोको !

दोनवडे (प्रतिनिधी) : फुलेवाडी ते गगनबावडा या मार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीने भरावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विभागीय कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, फुलेवाडी ते गगनबावडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे कित्येक जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रत्नागिरी-सिंधुदुर्ग व तळकोकण तसेच गोवा राज्याला हा रस्ता जवळ असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक असते. कुंभी कासारी, राजाराम व डी. वाय. पाटील कारखान्याची उस वाहतूक याच रस्त्याने होते. कोपार्डे येथील जनावरांचा बाजार, कळे, सांगरुळ या ग्रामीण भागातील मोठ्या व्यापारी पेठा याच मार्गावर आहेत. रोजगारासाठी कोल्हापूर शहराकडे जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. रस्ता अरुंद आहे. रस्त्यावर अतिक्रमण आहेत आणि रस्त्यात मोठे खड्डे असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करावे.

बालिंगे ते भोगावती नदीवर बांधण्यात येणारा पूल हा बास्केट ब्रिज करावा अन्यथा नदीकाठच्या गावांना पुराचा मोठा फटका बसणार आहे. बालिंगे, नागदेवाडी, पाडळी खुर्द, दोनवडे, साबळेवाडी, कोगे इत्यादी गावांना या पुराचा फटका बसणार आहे. गावात पाणी शिरून घरांचे नुकसान होणार आहे. तसेच शेतीचेही नुकसान होणार आहे.फुलेवाडी ते गगनबावडा रस्त्यावरील खड्डे डांबरीने पंधरा दिवसात भरावेत अन्यथा १५ ऑक्टोबर रोजी बालिंगे येथे वीस गावातील सरपंच व ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर राजेंद्र दिवसे, प्रकाश रोटे, संग्राम भापकर, तानाजी पालकर, मयूर जांभळे, शिवाजी देसाई, सारिका जाधव आदींच्या सह्या आहेत.