‘कागल’ मधील पाणीप्रश्न मार्गी लागणार : पालकमंत्र्यांचे समरजितसिंह घाटगे यांना आश्वासन

कागल (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेअंतर्गत प्रत्येक गावात “हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे शुद्ध पाणी पोहोचवण्याकरिता कागल विधानसभा मतदारसंघात हे मिशन यशस्वीरित्या राबवणेच्या दृष्टीने जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर समरजितसिंह घाटगे यांनी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीस जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे,आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे ही बैठक झाली. कागल विधानसभा मतदार संघात एकूण 129 गावच्या योजना प्रस्तावित असून 13 ( तेरा) योजनांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जवळपास 116 गावांमध्ये कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली, शिंदेवाडी,म्हाकवे, सावर्डे बुद्रुक, सोनाळी, व्हन्नूर पिंपळगाव बुद्रुक, तामनावाडा लिंगनूर (का) अर्जुनवाडा, करड्याळ,नंद्याळ, गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी, कौलगे ,बड्याचीवाडी आजरा तालुक्यातील उत्तुर, वडकशीवाले, भादवन या प्रमुख गावासह अनेक गावचा समावेश आहे. या गावच्या योजनांना तात्काळ मंजुरी देऊन ऑक्टोबरअखेर या सर्व कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या कामास गती द्यावी अशी या बैठकीत ठरले.

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन करिता 45% केंद्रशासन व 45 % राज्यशासन आणि दहा टक्के ग्रामपंचायत अंतर्गत निधी असा खर्च करण्यात येणार आहे. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही योजना कागल विधानसभा मतदार संघात राबविणेसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले.कागल विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित प्रत्येक गावात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ही योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी समन्वयाने काम करावे.अशी भूमिका यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी मांडली. या योजनेसाठी राज्य सरकार आवश्यक तो निधी व शासन स्तरावर सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले.