कोल्हापूर : डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना ‘आऊटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स, हायर एज्युकेशन अँड एक्सटेन्शन अवार्ड-2022’ ने सन्मानित करण्यात आले. तामिळनाडू येथील चेन्नई (तामिळनाडू ) येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत आंतरराष्ट्रीयख्यातीचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. वसंदराज डेव्हिड यांच्या हस्ते डॉ. के. प्रथापन यांना सन्मानित करण्यात आले.

कृषी विज्ञान, वनस्पती पोषण, तण व्यवस्थापन, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि मधमाशी पालनासाठी प्रशंसनीय योगदान आणि उच्च शिक्षण, विस्तार यासाठी दिलेले योगदान याबद्दल डॉ. के. प्रथापन यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. “कृषी व पूरक विज्ञान आणि औषधनिर्माण व पर्यावरण विज्ञानातील प्रगती” या विषयावर शनिवार 1 ऑक्टोबर रोजी झालेल्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ प्रथापन कार्यरत आहेत. तत्पूर्वी केंद्रीय रबर संशोधन संस्थेमध्ये सायंटिस्ट, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडूमधील रबर लागवडीयोग्य मातीसाठी संशोधन, केरळ कृषी विद्यापीठात कृषीशास्त्र विषयाचे प्राध्यापक, राष्ट्रीय फलोत्पादन योजना संचालक म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. गेली 33 वर्षे ते अध्यापन, संशोधन व विस्तार उपक्रमात सक्रिय आहेत. एमएस्सी व पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी ते मार्गदर्शक आहेत.
हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळल्याबद्दल कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ ए. के. गुप्ता यांनी डॉ. के. प्रथापन यांचे अभिनंदन केले.